कोणे एके काळी म्हणे राजकीय पक्ष हे ध्येय वेडे होते, त्यांचे कडे देश हिताचे , समाज हिताचे धोरण होते, समाजाचे व जनतेचे भले करावे हा शुद्ध हेतू होता.
आजच्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला ध्येयधोरण समाज हित याविषयी विचारा, ऐकून न ऐकल्यासारखे, समजून न समजल्या सारखे करून तो तुम्हाला टाळेल.
पक्ष व पक्षाच्या ध्येय धोरणासाठी अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली. परंतु हे सर्व विसरून आजचे नेते फक्त स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी पक्ष चालवत आहेत त्यांना ना समाजाची चिंता ना पक्षाच्या ध्येय धोरणाची. पक्ष हा स्वतःची तिजोरी भरण्याचा कारखाना आहे असा त्यांचा दाट समज आहे. नीती मूल्यांशी त्यांना काहीही घेणे देणे नाही सामाजिक बांधिलकी सामाजिक प्रश्न याची जराही जाणीव त्यांना उरलेली नाही. अत्यंत निगर गट कोडगेपणाने पक्ष राबवून स्वतःची तिजोरी कशी भरता येईल याचे डावपेच प्रत्येक जण आखत आहे त्यासाठी जनतेला व कार्यकर्त्यांना वेठीला धरले जात आहे. ना कार्यकर्त्यांची तमा ना जनतेची पर्वा. प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून, गुंड माफिया यांना राजकीय संरक्षण देऊन त्यांचे सर्व गुन्हे दाबून टाकून अनेक वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनी सर्व नीती मूल्यांना अक्षता लावून फक्त आणि फक्त पैसे कमावणे आणि संपत्ती जमवणे एवढेच ध्येय आता राजकीय पक्षाचे नेत्यांचे उरलेले आहे असे दिसते.
राजकीय स्वार्थासाठी आज कोण कोणाशी युती करेल याची कसलीही हमी कोणीही घेऊ शकत नाही एकमेकांच्या संपूर्ण विरोधात असलेले पक्ष फक्त सत्तेसाठी एक होत आहेत जनतेने दिलेल्या मताला काहीही किंमत राहिलेली नाही पैसा आज यांचा परमेश्वर बनलेला आहे.
कार्यकर्ते म्हणजे कशात न मशात अन सोंग तमाशात अशी गत आहे. साहेब म्हणतील तसं नाचायचं साहेब म्हणतील तसं ओरडायचं एवढेच एक ध्येय ठेवून कार्यकर्ते साहेबां मागे कुत्र्याप्रमाणे फिरत असतात स्वतःची काही अक्कल ना स्वतःचं काही भान पैशासाठी व दारू आणि जेवणासाठी स्वतःला संपूर्णपणे साहेबांपुढे गहाण ठेवलेले असते. साहेबाच्या इशाऱ्यानुसार धावायचे भुंकायचे चावायचे एवढेच एक त्यांचे ध्येय असते. साहेबांनी एखाद्या देशद्रोही काम जरी केलेले असले तरी ते अत्यंत आनंदाने त्यात सामील होत असतात आणि अर्थातच त्यांना त्यात कसलाही दोष वाटत नाही कसलीही लाज वाटत नाही कसलाही खेद वाटत नाही हे सर्व गोष्टी त्यांच्यासाठी नाहीतच.
ब्रिटिश व मोगलांच्या काळात राजद्रोह्यांना सरसकट ठार मारले जायचे परंतु आज देशद्रोह करणाऱ्यांना फ्रीडम ऑफ स्पीच च्या नावाखाली खुशाल मोकळे सोडून दिले जात आहे.
अशा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची दैना झालेली आहे ना कोणाला खंत ना खेद .
देव या देशाचे व या देशातील मूळ भारतीय जनतेचे संरक्षण करो हीच एकमेव इच्छा.