खरे बाबा खोटे बाबा

दचकलात! येथे आई बाबा मधले बाबा नाही, तर बुवाबाजी मधले बाबा. आजकाल बाबांचे पीक उगवलेले आहे, कोणतेही टीव्ही चॅनल वर बघा यूट्यूब चैनल वर बघा अनेक बाबा आपल्याला सत्संग उपदेश करत आहेत.
यातील अनेक बाबा, लोका शिकवी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण किंवा स्वतः खातो कोरडे श्याण या प्रकारचे आहेत. अमाप पैशाच्या मागे लागलेले, प्रसिद्धीच्या मागे लागलेले, गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले अशा स्वरूपाची ही माणसं स्वतःला परम ग्यानी जगद्गुरु असे समजतात. त्यांना स्वतःबद्दल काय समजायचे ते समजू दे, परंतु यांच्या मागे असलेले लाखो मेंढरं सुद्धा ही गोष्ट खरी समजतात आश्चर्य आहे स्वतःची विवेक बुद्धी गहाण टाकणारे लोक या बाबांना देव बनवतात आणि मग अत्यंत महागड्या गाड्यांमध्ये फिरणारे आलिशान महालामध्ये राहणारे, सतत बायकांच्या गराड्यात राहणारे, असे सर्व संगपरित्याग केलेले विद्वान बाबा लोकांना किंवा भक्तांना सुद्धा सर्व संगपरित्याग करण्याचे ज्ञान वाटत राहतात.

धन्य ते बाबा धन्य ते येडपट भक्त. बाबांच्या उच्चभृ राहणीमानाला व ऐश्वर्याला बोललेले भक्त आपल्यावर बाबाजी कृपा जर झाली तर आपणही असेच श्रीमंत बनू या वेड्या आशेने, भुताळ्यासारखे बाबाच्या भजनी लागलेले असतात बाबाही वेताळासारखा त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांना आपल्या कब्जातून सुटू देत नाही. सर्वसामान्यपणे स्त्रियांवर या बाबांचे मोहजाल मायाजाल फार लवकर पसरते व या स्त्रिया घरातील कर्त्या पुरुषाला सुद्धा या बाबांच्या भजनी लावतात. अर्थातच अशा कुटुंबाचा काहीही फायदा या बाबांपासून होत नसतो तर वेळ वाया घालवून आयुष्यातील बहुमूल्य अशा संधी हातातून दवडल्या जातात. अनेक वर्षे या बाबांच्या मागे वाया घालवून सुद्धा या बाबांकडून भक्तांना काहीही फायदा होत नाही तरीही अतूट व आढळ अशा बावळट निष्ठेने हे अंध भक्त मरेपर्यंत या बाबांची भक्ती सोडत नाही.

तुकोबा ज्ञानोबा नामदेव व इतर अशा अनेक खऱ्या खऱ्या संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला आज काहीच किंमत उरलेली नाही करण्यात येत आहे आणि ज्या बाबाकडे अमाप संपत्ती आहे त्याची भक्ती करण्यामध्ये शान व समजदारी समजण्यात येत आहे.

सर्व तरुण मुले याच कारणास्तव पंढरीचा रस्ता सोडून शिर्डी व तत्सम श्रीमंत देवस्थानाच्या रस्त्याच्या मार्गे लागलेले आहेत त्यांना लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे आहे भक्ती विरक्ती या गोष्टी आज इतिहास जमा झालेले आहे नवीन पिढीला याच्याशी काहीही घेणे देणे नाही याचमुळे नंतर प्रचंड नैराशीनेही पिढी गुरफटून जाते व शेवटी नशा करू लागते त्यातही मजा येऊ लागली नाही की मग आयुष्य संपवण्याचा प्रयत्न होतो खऱ्या भक्ती पासून दूर गेल्यामुळे आजच्या पिढीची प्रचंड वाताहात आलेली आहे.

खरा गुरु हा मोहमाये पासून अलिप्त राहून आवश्यक तेवढेच घेऊन आनंदात कसे राहता येईल हे शिकवतो परंतु आजचे शिकलेले सुशिक्षित असे दीड शहाणे लोक या सर्व गोष्टींना मूर्खपणा समजतात व खोट्या बाबांच्या मागे लागून स्वतःचे जीवन नरक बनवून घेतात.

थोडेफार खरे बाबा सोडल्यास प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून स्वतःला अवतार घोषित करू इच्छिणारे ढोंगी बाबा आजच्या पिढीला बरबाद करत आहे परंतु यावर नियंत्रण ठेवणारी एकही शक्ती आज तरी दिसत नाही अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या समिती सुद्धा येथे काहीच करू शकत नाही कारण पैसा कमावणे हेच आजचे पूजन हेच आजचे भजन व हेच आजचे दैवत बनलेले आहे.

असो! कोण काय करत आहे हे देव तर बघतच आहे, देवकाठी घेऊन मागे लागत नाही म्हणतात परंतु देव काही शिक्षा करतो असेही वाटत नाही नाहीतर असे अनेक बाबा आज जागोजागी उगवले नसते, ठीक आहे , आली या देवाजीचे मनात येते कोणाचे काही चालेना.

हिच जर देवाची इच्छा असेल तर आपण पामरे काय करू शकतो ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान असे म्हणून आपण स्वतःचे समाधान करून घ्यावे यातच आपले भले आहे.

आजकालचे राजकारण!

कोणे एके काळी म्हणे राजकीय पक्ष हे ध्येय वेडे होते, त्यांचे कडे देश हिताचे , समाज हिताचे धोरण होते, समाजाचे व जनतेचे भले करावे हा शुद्ध हेतू होता.
आजच्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला ध्येयधोरण समाज हित याविषयी विचारा, ऐकून न ऐकल्यासारखे, समजून न समजल्या सारखे करून तो तुम्हाला टाळेल.
पक्ष व पक्षाच्या ध्येय धोरणासाठी अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली. परंतु हे सर्व विसरून आजचे नेते फक्त स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी पक्ष चालवत आहेत त्यांना ना समाजाची चिंता ना पक्षाच्या ध्येय धोरणाची. पक्ष हा स्वतःची तिजोरी भरण्याचा कारखाना आहे असा त्यांचा दाट समज आहे. नीती मूल्यांशी त्यांना काहीही घेणे देणे नाही सामाजिक बांधिलकी सामाजिक प्रश्न याची जराही जाणीव त्यांना उरलेली नाही. अत्यंत निगर गट कोडगेपणाने पक्ष राबवून स्वतःची तिजोरी कशी भरता येईल याचे डावपेच प्रत्येक जण आखत आहे त्यासाठी जनतेला व कार्यकर्त्यांना वेठीला धरले जात आहे. ना कार्यकर्त्यांची तमा ना जनतेची पर्वा. प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून, गुंड माफिया यांना राजकीय संरक्षण देऊन त्यांचे सर्व गुन्हे दाबून टाकून अनेक वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनी सर्व नीती मूल्यांना अक्षता लावून फक्त आणि फक्त पैसे कमावणे आणि संपत्ती जमवणे एवढेच ध्येय आता राजकीय पक्षाचे नेत्यांचे उरलेले आहे असे दिसते.

राजकीय स्वार्थासाठी आज कोण कोणाशी युती करेल याची कसलीही हमी कोणीही घेऊ शकत नाही एकमेकांच्या संपूर्ण विरोधात असलेले पक्ष फक्त सत्तेसाठी एक होत आहेत जनतेने दिलेल्या मताला काहीही किंमत राहिलेली नाही पैसा आज यांचा परमेश्वर बनलेला आहे.

कार्यकर्ते म्हणजे कशात न मशात अन सोंग तमाशात अशी गत आहे. साहेब म्हणतील तसं नाचायचं साहेब म्हणतील तसं ओरडायचं एवढेच एक ध्येय ठेवून कार्यकर्ते साहेबां मागे कुत्र्याप्रमाणे फिरत असतात स्वतःची काही अक्कल ना स्वतःचं काही भान पैशासाठी व दारू आणि जेवणासाठी स्वतःला संपूर्णपणे साहेबांपुढे गहाण ठेवलेले असते. साहेबाच्या इशाऱ्यानुसार धावायचे भुंकायचे चावायचे एवढेच एक त्यांचे ध्येय असते. साहेबांनी एखाद्या देशद्रोही काम जरी केलेले असले तरी ते अत्यंत आनंदाने त्यात सामील होत असतात आणि अर्थातच त्यांना त्यात कसलाही दोष वाटत नाही कसलीही लाज वाटत नाही कसलाही खेद वाटत नाही हे सर्व गोष्टी त्यांच्यासाठी नाहीतच.

ब्रिटिश व मोगलांच्या काळात राजद्रोह्यांना सरसकट ठार मारले जायचे परंतु आज देशद्रोह करणाऱ्यांना फ्रीडम ऑफ स्पीच च्या नावाखाली खुशाल मोकळे सोडून दिले जात आहे.

अशा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची दैना झालेली आहे ना कोणाला खंत ना खेद .

देव या देशाचे व या देशातील मूळ भारतीय जनतेचे संरक्षण करो हीच एकमेव इच्छा.